मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली आहे. पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्स्प्रेस पुढे जाऊच शकलेली नाही. या एक्स्प्रेसमध्ये ७०० प्रवासी अडकले आहेत. काही वेळापूर्वीच एनडीआरएफच्या चार तुकड्या या सगळ्यांच्या सुटकेसाठी या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. एक्स्प्रेसमध्ये अडकलेले सगळे प्रवासी सुखरुप आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठीचे बचावकार्य सुरु करण्यात आल्याची माहिती कोल्हापुरात देण्यात आली आहे.पहाटे तीन वाजल्यापासून रेल्वे रुळावरच असल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही लोक दोरी आणि बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य घेऊन आले आहेत. पहाटेच्या तुलनेत आत्ता रुळांवर साठलेले पाणी सहा इंचांपर्यंत कमी झाले आहे. पाणी ओसरत असल्याने सध्या काळजी वाटत नाही मात्र पाणी वाढले एक्स्प्रेसही पुढे जाईना तेव्हा आमच्या काळजाचा ठोका चुकला होता असं रेल्वेत अडकलेला प्रवासी स्वप्निल लुगडे याने सांगितलं आहे. स्वप्निल जुना बुधवार पेठ, कोल्हापूरचा रहिवासी आहे.
