पाकिस्तानात दोन आत्मघातकी हल्ले, ७ ठार

पाकिस्तानच्या वायव्य भागात खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका तपासणी नाक्यावर आणि त्यानंतर या हल्ल्यातील पीडितांना नेण्यात आलेल्या रुग्णालयात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात रविवारी चार पोलिसांसह किमान सात जणांचा मृत्यू झाला, तर अन्य ४० जण जखमी झाले आहेत. यापैकी रुग्णालयातील हल्ला एका बुरखाधारी महिलेने घडवला. महिला आत्मघातकी हल्लेखोराने हल्ला घडवण्याची या भागातील ही पहिली आणि अनपेक्षित घटना आहे.

आपण हा हल्ला केल्याचे तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात नव्यानेच समाविष्ट झालेल्या टोळ्यांच्या या भागात शनिवारीच प्रथमच निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. दोन मोटरसायकलवरून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी डेरा इस्माइल खान येथील कोटला स्येदान तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या दोन पोलिसांवर गोळीबार करून त्यांना ठार केले. या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणले असता, तिथे आधीपासूनच बसलेल्या एका बुरखाधारी महिलेने अॅम्ब्युलन्सभोवती जमलेल्या व्यक्तींना लक्ष्य करत स्फोट घडवला. यामध्ये दोन पोलिसांसह पाच जण मृत्युमुखी पडले. अनेक जखमींची अवस्था गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

हल्लेखोर महिलेने स्वत:ला संपूर्णपणे बुरख्यात झाकून घेतले होते. हल्लेखोराचे केस आणि पाय यांचे अवशेष घटनास्थळी आढळले असून ते फोरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या आत्मघातकी हल्ल्यात सात ते आठ किलो स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची पोलिसांकडून तपासणी केली जाते. मात्र या भागातील प्रथा-परंपरांनुसार महिलांना या तपासणीतून सवलत दिली जाते, असे पोलिसांनी सांगितले. एके काळी दहशतवाद्यांचा वरचष्मा असलेल्या उत्तर व दक्षिण वाझिरिस्तानासाठी डेरा इस्माइल खान हे प्रवेशद्वार मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *