कोकणात ‘कोसळ’धार, नद्यांना पूर; महामार्गावरील वाहतूक ठप्प

मुसळधार पावसाने कोकणात थैमान घातले असून वाशिष्ठा आणि जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही नद्यांना पूर आला असून जगबुडीच्या पुलावरील वाहतूक थांबवण्यात आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. रत्नागिरी, खेड चिपळूणलाही पावसाने झोडपून काढले आहे. खेडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून नदीकाठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जगबुडी नदीच्या पाण्याची सध्याची पातळी ६.४० मीटर असून ६ मीटरनंतर धोक्याचा इशारा दिला जातो. त्यामुळे खेड शहरातील नदीकाठावरील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने वाशिष्ठा आणि जगबुडी या दोन नद्यांना पूर आला आहे. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासूनच वाशिष्ठा नदीच्या पाण्याची पातळी वाढायला लागली आणि पूरस्थिती निर्माण झाली. शहरातील बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी हा भाग पाण्याखाली गेला आहे. चिपळूण बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे बाजारपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल पाण्याखाली गेल्याने पुलावरील महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहतूक गुहागर बायपासवरून वळवण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *