याकूब मेमनच्या फाशीनं अतीव दुःख झालेल्या, खवळलेल्या काही धर्मांध मुस्लिमांपैकीच झुबेर खान हाही एक होता. त्यानं सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकून या फाशीचा निषेध केला होता. याकूबला ‘शहीद’ ही उपाधी लावण्याचा प्रताप त्यानं केलाच, पण त्याच्या फाशीचा बदला घेण्यासाठी भारतीय नागरिकत्व सोडून आयसिसमध्ये जायची इच्छाही त्यानं व्यक्त केली होती. खलिफ बगदादीच्या नावे लिहिलेल्या संदेशात त्यानं आपल्याबद्दलची सगळी माहिती दिली होती. आयसिसच्या प्रवक्तेपदासाठी जणू तो ‘बायोडेटा’च होता.
दिल्लीतील वसंत विहारमधल्या एका दूतावासात झुबेर व्हिसा घ्यायला गेल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर, वेगानं सूत्र हलवत त्यांनी त्याला तिथेच अटक केली. आता त्याची सखोल चौकशी करण्यात येत असून गरज पडल्यास त्याची मानसिक स्थितीही तपासून पाहिली जाऊ शकते. त्याच्या अटकेमुळे, सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांना चांगलाच चाप बसू शकतो.

