मुंबईत उद्या मुसळधार पावसाचा अंदाज

शुक्रवारपासून मुंबईत सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण उडवून आज बुधवारी दिलासा दिला असला तरी उद्या गुरुवारी पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. मात्र या पावसाचा जोर तुलनेने कमी असेल असेही वेधशाळेने म्हटले आहे. आज बुधवारी मुंबईच्या समुद्रात उंच लाटा उसळतील असा इशाराही वेधशाळेने दिला आहे.

मान्सून सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टीवर ठिकठिकाणी मुसळधार पावसाची स्थिती सुरूच असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. मुंबईसह उत्तर कोकण पट्टा मान्सूनने व्यापलेला आहे. काही भागांमध्ये मुसळधार ते अतीवृष्टीची शक्यता आहे. त्यानंतर पुढील २४ तासांत पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.

बुधवारी दुपारपर्यंत मुंबई किंवा उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस होणार नाही, असा अंदाज महेश पालावत या स्कायमेटया हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आज बुधवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून येत्या ४ जुलैला मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही पालावत यांनी सांगितले आहे. हा पाऊस ८० ते १०० मिमी दरम्यान होईल असा अंदाज आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातही मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. मुंबईत ४ जुलैला पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये मुंबईत ७९५ मिमी इतका पाऊस पडल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *