‘वायू’ चक्रीवादळ 13 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश शहा यांनी दिले. तसेच यादरम्यान वीजसेवा, दूरसंचार सेवा आणि पिण्याच्या पाण्याची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, शाह यांनी आपात्कालिन नियंत्रण कक्षाला 24 तास अलर्ट राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तसेच एनडीआरएफच्या 26 टीम तैनात करण्यात आल्या असून गुजरात सरकारच्या मागणीनुसार आणखी 10 टीम लवकरच पाठवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त भारतीय तटरक्षक दल, नौदल, सैन्यदल आणि हवाई दलालाही अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. तसचे टेहळणी विमान आणि हेलिकॉप्टर्समधूनही परिस्थितीची पाहणी सुरू आहे. या चक्रीवादळाचा फटका गुजरातसोबतच महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने गृहमंत्रालयाने अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हवामान खात्याने सौराष्ट्र आणि किनारपट्टीजवळील भागांमध्ये 14 जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची तसेच 110 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे सुटण्याची सुचना जारी केली आहे. या वायू चक्रीवादळाचा मान्सूनवरही प्रभाव पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीदेखील आपात्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रूपाणी यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. तसेच ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जाणवू शकतो अशा 10 जिल्ह्यांमध्ये 13 आणि 14 जून रोजी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याची घोषणा केली. दरम्यान, आपण ओदिशा सरकारशीही संपर्कात असून फॅनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी त्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या होत्या याची माहिती घेत असल्याचेही सांगितले.
