पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच: सुधीर मुनगंटीवार

मुख्यमंत्रिपदाबाबत काय फॉर्म्युला ठरला, हे माहीत नाही. मात्र, ‘इस बार २२० पार’ या भावनेने काम करण्याच्या सूचना अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. भाजपचा मुख्यमंत्री होईल हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, याबाबत शिवसेनेने अजून नाराजी व्यक्त केली नसल्याचा दावा राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. शिवसेना-भाजपची मैत्री अमर आहे. ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असे आमचे प्रेम आहे. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या भावनेने आम्ही काम करतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

राज्याच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या नाशिक विभागातील तयारीचा आढावा घेण्यासाठी मुनगंटीवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर नेहमीच टीका केली आहे. या टीकेतून बोध घेऊन आमचे सरकार अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील २५ वर्षे अशीच टीका करण्याची संधी मिळो, हीच सिद्धीविनायकचरणी प्रार्थना करतो, अशा खोचक शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *