फळभाज्या महागल्या असतानाच आता पालेभाज्यांच्या भावातही वाढ झाली आहे. वातावरणातील वाढलेली उष्णता आणि अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या दुष्काळस्थितीमुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली आहे. परिणामी पालेभाज्यांच्या भावात पूर्वीच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढ झाली असून, १० रुपयांना मिळणारी भाजीची जुडी आता ३० रुपयांवर पोहोचली आहे.
दरम्यान, कोथिंबीरची जुडी तर ३० ते ४० रुपयांवर गेली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर ५० ते ६० रुपयांना विकत घ्यावी लागत असून, १० रुपयांना १० काड्या या हिशेबाने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात इतर पालेभाज्यांचे भावही वाढले आहेत. कांदा पात, मुळा आणि शेपूची जुडी ३० ते ४० रुपयांना विकली जात आहे, तर मेथीची जुडी ४० ते ५० रुपयांवर पोहोचली आहे. इतक्या महाग पालेभाज्या घेणे गृहिणींना परवडत नसल्याने व्यापारीही जुड्या सोडून भाज्या विकत आहेत. आता पावसाळा सुरू होऊन नवीन लागवड होईपर्यंत हे भाव चढेच राहणार असल्याचे सांगण्यात येते .
