केरळमधील स्थानिक मल्याळम दैनिकात वर्षभरापूर्वी काम करणारा एक २४ वर्षीय पत्रकार ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे खळबळजनक वृत्त आहे.
केरळमधील पालाक्कड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिकात हा पत्रकार काम करत होता. ही नोकरी सोडून त्याने आधी आखाती देशात नोकरी केली त्यानंतर आता सीरिया गाठून तो ‘आयसिस’साठी काम करतोय, अशी माहिती पुढे आली आहे. ‘आयसिस’साठी केरळमध्ये भरती होत असल्याची खबर केंद्रीय गुप्तचर विभागाने (आयबी) केरळच्या गृह मंत्रालयाला आधीच दिली होती. त्यातच दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गृह मंत्रालयाने केरळच्या पोलीस महासंचालकांना केरळचा पत्रकार आता ‘आयसिस’साठी काम करत आहे, अशी माहिती दिली आहे. केरळमधील ‘मल्याळम मनोरमा’ या दैनिकाच्या वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी किमान १३ भारतीय तरुण ‘आयसिस’मध्ये सहभागी झाले. त्यातील ६ जण मारले गेले असून ७ जण आजही या दहशतवादी संघटनेसाठी काम करत आहेत. कल्याण, तेलंगण आणि बंगळुरू या ठिकाणच्या तरुणांचा यात समावेश आहे. जो केरळचा पत्रकार ‘आयसिस’मध्ये सहभागी झालाय तो जिवंत आहे की नाही, याबाबतही कोणतीही माहिती गुप्तचर यंत्रणांना नाही.

