अंबरनाथमध्ये 20 कुत्रे आणि 6 मांजरींची विषप्रयोगातून हत्या?

अंबरनाथ शहरातील भीमनगर परिसरात 20 कुत्रे आणि 6 मांजरींवर विषप्रयोग केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने खाद्यपदार्थातून या परिसरातील भटके कुत्रे आणि मांजरींवर विष प्रयोग केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील 20 श्वान आणि 7 मांजरींचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथ पूर्वेकडील भीम नगर परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास बाहेर पडलेल्या नागरिकांना काही भटके कुत्रे मरुन पडल्याचे आढळले. त्यांनी पालिका आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यांना केवळ सहा कुत्रे आणि एक मांजर मृतावस्थेत आढळली. मृत भटक्या श्वानांची संख्या 20 च्या जवळपास असण्याची शक्यता स्थानिक प्रदीप अहिरे यांनी व्यक्त केली आहे. तर मनिष बावस्कर यांच्या घरच्या चार मांजरींचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मांजरी विव्हळत असल्याचं पाहिल्यानंतर स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र त्या मांजरींचा मृत्यू झाला. या मृत प्राण्यांना बदलापूरच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या प्राण्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय अंबरनाथ नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कृत्याबद्दल परिसरातील रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *