बुधवारी दुपारी खेळताना सोहन राहूल यादव हा दीड वर्षाचा मुलगा सुमारे १८ ते २० फुट खोल विंधन विहिरीमध्ये (बोअरवेल) पडला होता. सोहमला पुणे अग्निशमन दल आणि एनडीआरफच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन सात तासानंतर बाहेर काढले.
दरम्यान सोहम यादवला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर प्रथम उपचारासाठी सासवडच्या चिंतामणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला पुण्यातील केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. चिमुकल्या सोहमची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
राहुल साहेबराव यादव यांनी आपल्या घराजवळ सुमारे ३०० फूट खोल बोअरवेल खोदले होते, मात्र त्याला पाणी लागले नाही. त्यामुळे राहुल यांनी या बोअरवेलवर रिकामे पोते झाकण म्हणून ठेवले होते. त्यांचा मुलगा रोहन याचा खेळत असताना त्या पोत्यावर पाय पडला आणि तो बोअरवेलमध्ये २० फूट खोलीवर जाऊन अडकून बसला. या घटनेची माहिती मिळताच गावक-यांनी त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, यश न आल्यामुळे अखेर मदत व बचाव पथकाला वर्दी देण्यात आली.
यानिमित्ताने, काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील एका गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या ‘प्रिन्स’ची आणि त्याला वाचवण्यासाठी झालेल्या धडपडीची व देशभरातील लोकांनी त्याला वाचवण्यासाठी केलेली प्रार्थना, पूजा- अर्चा याची सर्वांना आठवण झाली.

