कुस्तीपटू नरसिंह यादवला संजय निरुपमांचा प्रचार भोवला; पोलीस सेवेतून निलंबित

काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा प्रचार कुस्तीपटू नरसिंह यादवला भलताच महागात पडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नरसिंह यादवला पोलीस सेवेतूनही निलंबित करण्यात आले. नरसिंह यादव हा सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर कार्यरत आहे. रविवारी नरसिंहने वायव्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती. परंतु, नरसिंह सरकारी सेवेत असल्याने त्याच्या प्रचारावर विरोधकांनी आक्षेप घेतला. या तक्रारीची दखल घेत बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांकडून अहवाल मागवण्यात आला होता. सोमवारी या आरोपांची शहानिशा करण्यासाठी व्हिडीओ आणि फोटो यांची पडताळणी करण्यात आली. त्यात यादव यांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काहीवेळातच प्रशासनाकडून त्याच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली.

नरसिंह यादवने २०१० सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्या या कामगिरीचा गौरव म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात त्याची उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे २०१२ मध्ये नरसिंहला सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर नियुक्ती मिळाली होती. मात्र, आता निरुपमांच्या प्रचारामुळे नरसिंहच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

वायव्य मुंबईत संजय निरुपम यांच्यासमोर शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांचे आव्हान आहे. भाजप-शिवसेना युतीमुळे किर्तीकर यांचे पारडे जड असले तरी संजय निरूपम यांच्या जोरदार प्रचारामुळे ही लढत चुरशीची झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *