११९ रुपयांचा रिचार्ज ८० हजारांना!

पत्नीच्या मोबाइलसाठी ‘गुगल पे’वरून ११९ रुपयांचा रिचार्ज करणे अंधेरीमधील एका चालकाला चांगलेच  महागात पडले आहे. पैसे कापले जाऊनही रिचार्ज न झाल्याने या चालकाने कस्टमर केअरमध्ये संपर्क केला आणि तब्बल ८० हजार रुपये गमावले. याबाबत या चालकाच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अंधेरी मरोळ येथे राहणारा अनिल यादव हा एका हॉटेलमध्ये चालकाची नोकरी करतो. मूळचा झारखंडचा असलेल्या यादव याने सहा मार्च रोजी पत्नीला मोबाइलसाठी ‘गुगल पे’द्वारे ११९ रुपयांचे रिचार्ज केले. गुगल पे अॅपला अनिल याने आपल्या युनियन बँकेतील बचत खाते क्रमांक जोडला होता. रिचार्ज करताच त्याला खात्यामधून ११९ रुपये वजा झाल्याचा संदेश आला. पत्नीला फोन केल्यावर तिने मात्र रिचार्ज झाला नसल्याचे सांगितले.

याबाबत विचारणा करण्यासाठी अनिल याने गुगल पेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. सुरुवातीला फोन व्यस्त आल्यानंतर काही वेळानंतर अनिल याला समोरून फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगितले. काही तांत्रिक बिघाडामुळे तुम्हाला रिचार्ज झाला नसावा, तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे करा, असे सांगून या व्यक्तीने अनिल यांना ‘गुगल पे’वरून आधी दहा हजार रुपये पाठवण्यास सांगितले. हे पैसे तुम्हाला परत केले जातील. केवळ नेमका काय बिघाड आहे, हे कळण्यासाठी हे करणे जरुरीचे असल्याचे सांगितले. अनिलने त्यावर विश्वास ठेवून आधी दहा हजार रुपये पाठवले. ‘गुगल पे’वर तुमचे पैसे येतच नसल्याचे तसेच इतर वेगवेगळी कारणे सांगून तब्बल ८० हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिल याने पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस फसवणूक करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *