विमानाचा दरवाजाही सापडला, बेपत्ता एमएच370 चे अवशेष असण्याची शक्यता

विमानाचा दरवाजाही सापडला, बेपत्ता एमएच370 चे अवशेष असण्याची शक्यता

8 मार्च 2014 रोजी आश्चर्यकारकरित्या बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या एमएच370 विमानाची शोधमोहीम शेवटच्या टप्प्यात आल्याची शक्यता बळावली आहे. तब्बल दीड वर्षांनंतर बेपत्ता विमानाबाबत धागेदोरे हाती लागत आहेत.

पोलिसांना सेंट डेनिस शहराच्या दक्षिणेकडील समुद्राच्या भागात विमानाचा दरवाजा सापडला आहे. संबंधित दरवाजावर परदेशी भाषेमध्ये काहीतरी लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं. बुधवारी याच परिसरात विमानाच्या पंखाचा एक भाग सापडला होता. विशेष म्हणजे बेपत्ता झालेलं मलेशियन एअरलाईन्सचं विमान ज्या बोईंग 777 जातीचं होतं, त्याच जातीचे हे दोन्ही अवशेष आहेत.

संबंधित अवशेष हे मलेशियाच्या ‘त्या’ बेपत्ता विमानाचेच असल्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी आजवरच्या इतिहासात एकही बोईंग 777 जातीचे विमान समुद्रावर बेपत्ता न झाल्याने हे अवशेष त्याच विमानाचे असल्याचं बोललं जात आहे.

बुधवारी रियुनियन द्वीपसमूहाजवळ सापडलेला विमानाच्या पंखाचा भाग तपासणीसाठी फ्रान्सला पाठवण्यात आला आहे. तो भाग बोईंग 777 चा असल्याचं मलेशियाच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितलं.

8 मार्च 2014 रोजी मलेशियन एअरलाईन्सचं क्वालालंपूरहून बीजिंगला जाणारं एमएच 370 हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच बेपत्ता झालं होतं. विमानात 7 कर्मचाऱ्यांसह 239 जण प्रवास करत होते. विमान बेपत्ता होण्यामागे अपहरणापासून क्रॅशिंग आणि आत्मघातापासून विमान मिसाईलने पाडलं गेल्यापर्यंत अनेक तर्कवितर्क लढवले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *