महाराष्ट्रातील या उमेदवाराची संपत्ती फक्त ९ रूपये

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यासोबत संपत्तीचे प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागते. यामध्ये त्या उमेदवाराच्या संपत्तीची माहिती समजते. सोलापूरमधून अर्ज दाखल करण्यात आलेल्या एका उमेदवाराची संपत्ती फक्त ९ रूपये असल्याचे समोर आले आहे. व्यंकटेश्‍वर महास्वामी असे त्यांचे नाव आहे.

व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी मंगळवारी सोलापूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी फक्त नऊ रुपये हातात असल्याचा उल्लेख केला आहे. त्याच वेळी त्यांनी ४५ हजार रुपयांचे कर्ज हात उसने घेतल्याचे म्हटले आहे. व्यंकटेश्‍वर महास्वामी यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही, तसेच त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे

सोलापूर लोकसभा मतदारसंघ यंदा स्वामींच्या उमेदवारींमुळे चर्चेत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून भाजपाच्या वतीने डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनीही हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली. व्यंकटेश्‍वर महास्वामी ऊर्फ दीपक गंगाराम कटकधोंड, असे त्यांचे नाव आहे.

भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर यांच्याकडे ६ कोटी ४६ लाख ०७९ रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१ लाख ८१ हजार रूपयाची संपत्ती आहे. पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३ लाख ८६ हजार २७३ रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९ लाख ५५ हजार ४५४ रूपये इतकी आहे.

कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीमध्ये त्यांचे नाव आहे. ३१ वर्षीय व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातून बीकॉम ची पदवी घेतली आहे. केवळ नऊ रुपये हाती आणि ४५ हजार रुपयांचे कर्ज घेतलेले महास्वामी रिंगणात कितपत टिकाव धरून राहतात, या बाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *