अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बॉलिवूडची ‘छम्मा छम्मा’ आणि ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उर्मिलाला काँग्रेसकडून आज दिल्लीत बोलवण्यात आले होते.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

उर्मिलाने काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले असून उत्तर मुंबईतून उर्मिलाला अधिकृत उमेदवारी घोषित होणार असल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक २०१९ साठी उत्तर मुंबईतून मराठी अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनीही उमेदवारी मागितली होती. परंतु उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून उर्मिलाचे नाव पुढे आले आहे. उर्मिलाला उमेदवारी मिळाल्यास उर्मिलाचा मुकाबला भाजपाचे तगडे उमेदवार खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे. गोपाळ शेट्टी त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याचा प्रयत्न आहे.

२०१४ साली उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून संजय निरुपम यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर निरुपम इथून निवडणूक लढवण्यास तयार नसून त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राम नाईक यांचा अभिनेते गोविंदा यांनी पराभव केला होता. हा इतिहास लक्षात घेता ग्लॅमरस चेहरा दिला तर उत्तर मुंबईत चमत्कार होऊ शकतो अशी आशा काँग्रेसला आहे. त्यामुळे आता उर्मिलाने उत्तर मुंबईतून निवडणूक लढवल्यास कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *