मच्छरांमुळे मुंबईकर आजारी पडला असताना आता मच्छरांनी आपला मोर्चा रेल्वे स्थानकात वळवला आहे. विश्रांतीनंतर पडलेल्या पावसानंतर वांद्रे स्थानकात प्रवाशांसोबत हजारो डासही डब्यात सराईतपणे प्रवेश करत आहेत.
आधीच गर्दीमुळे प्रवाशांना पाय हलवण्यासाठी ही जागा नसताना डासांमुळे पाय आपटण्याची वेळ रेल्वेच्या लाखो प्रवाशांवर आली आहे. वांद्रे स्थानकांवरून लोकल पकडणा-यांची अवस्था त्यापेक्षाही वाईट आहे.
बीकेसीच्या अद्ययावत, वातानुकूलित कार्यालयांमधून बाहेर पडून संध्याकाळी वांद्रे स्थानकांवर गर्दी करून लोकलमध्ये चढण्याची धडपड करणा-या हजारो जणांना डासांनी त्राही त्राही करून सोडले आहे. वांद्रे स्थानकांवर डासांची समस्या नेहमीचीच.
पूर्वेला स्थानकाला लागून असलेल्या हजारो झोपडया, स्वच्छ न केलेली गटारे, बाजूची खाडी यामुळे या ठिकाणी डास रोजच दिमतीला हजर असतात. मात्र २१ जुलैच्या पावसानंतर या डासांच्या संख्येत दसपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे घरी पोहोचण्यासाठी नाही तर डासांपासून सुटका होण्यासाठी लोकल लवकर येऊ दे असा धावा केला जातो.
वांद्रे स्थानकात डासांचा त्रास नेहमीचाच आहे. त्यातच पावसामुळे तुंबलेल्या गटारांवरून लाखो डास फिरताना दिसतात. संध्याकाळीच नाही तर दिवसाही डासांची समस्या आहे. मात्र रेल्वेकडून याबाबत काही उपाय केल्याचे दिसत नाहीत, असे वांद्रे स्थानकावरून नियमित प्रवास करणा-या विनोद बांगर यांनी सांगितले.
डासांवाटे मलेरिया, डेंग्यू या आजारांचा प्रसार होतो. घरातील, इमारतीत डास उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साठू देऊ नका, असे पालिकेकडून सांगितले जाते. पण वांद्रे स्थानकावर चावणा-या डासांचे काय करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
वांद्रे येथील शॉपिंग मॉलमध्ये काम करणा-या मीना शिंदे व त्यांच्या सहका-यांचीही तीच कथा आहे. रोज रात्री वांद्रे स्थानकावरून गाडी पकडताना हाल होतात. कितीही पाय आपटले तरी डास पायावरून हटत नाही. रोज हातापायांवर डंखांनी सूज येते, असे मीना शिंदे म्हणाल्या.
लोकलमध्ये चढल्यावरही ही समस्या दूर होत नाही. कारण प्रवाशांसोबत डासही लोकलमध्ये प्रवेश मिळवतात व त्यानंतर लोकलमध्ये डासांना मेजवानी मिळते. वांद्रे स्थानकाबाहेर असलेल्या झोपडपट्टीतील गटारे साफ करण्याचे काम पालिकेकडे आहे. मात्र या ठिकाणी रोज टाकल्या जाणा-या कच-यामुळे तसेच रहिवाशांच्या असहकार्यामुळे काम करणे अवघड जाते, असे पालिकेच्या एका अधिका-याने सांगितले.

