घरगुती वादातून मंत्रालयातील एका सहसचिवाने आज पहाटे पत्नीवर गोळी झाडून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विजय भागवत पवार असे या सहसचिवाचे नाव आहे. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे ही घटना घडली आहे. पवार हे मंत्रालयातील कौशल्य विकास विभागात नुकतेच सह सचिव पदावर रुजू झाले होते.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार आपल्या मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या गावी आले असता काल रात्री त्यांचा पत्नीशी वाद झाला. त्यानंतर त्यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या आणि स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र, सुदैवाने यात पत्नी सोनाली या बचावल्या असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
