भालचंद्र कोल्हटकर यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोल्हटकर यांचे बुधवारी सकाळी सातच्या सुमारास डोंबिवलीत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले, ते त्र्याऐंशी वर्षांचे होते. डोंबिवलीतील नाट्यचळवळीचा आधारस्तंभ हरविल्याची भावना नाट्यक्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

शालेय वयापासूनच नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या भालचंद्र कोल्हटकर यांनी तरुण वयात डोंबिवलीतील गुरुदत्त मित्र मंडळात प्रवेश केला. युवा नाट्यकर्मींची संस्था म्हणून ओळखल्या जाणा-या या व्यासपीठाच्या माध्यमातून शहरातील नवोदित कलाकारांना एकत्र आणले जात होते. शहरात नाट्यचळवळ रुजावी यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करतानाच त्यांनी सहलीला सावली आली, अर्ध्याच्या शोधात दोन यांसारख्या प्रायोगिक नाटकात अभिनय केला. अभिनयासह कलाकारांना मार्गदर्शन करत नाट्यचळवळ रुजविणे यांची धुरा कोल्हटकरांनी पेलली होती. खाजगी क्षेत्रात नोकरी स्विकारल्याने ते व्यावसायिक नाटकांकडे वळले नाहीत. मात्र नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ते नाट्यचळवळीत सक्रीय होते. शहरातील अनेक संस्थांचे मार्गदर्शक, सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. नाट्य, साहित्य यांसारख्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावत. ते नवोदितांना मार्गदर्शन करायचे. राज्य नाट्य स्पर्धेच्या परिक्षणाची धुराही त्यांनी अनेक वर्ष सांभाळली. मागील काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. अखेरीस बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शहरातील सांस्कृतिक वर्तुळात पोकळी निर्माण झाली असून अखेरपर्यंत त्यांचा उत्साह ही त्यांची ओळख असल्याची भावना त्यांचे निकटवर्तीय अभिनेते नंदू गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *