लग्न सोहळ्यात सहभागी होऊन तेथील दागिने आणि रोख रक्कम लंपास करणारी अल्पवयीन चोरटय़ांची टोळी राजापेठ पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून दोन लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजापेठ परिसरातील दीपार्चन सभागृहात गेल्या १९ फेब्रुवारीला एका लग्न सोहळ्यातून सोन्याचे तीन मंगळसूत्र, चांदीच्या तोरडय़ा आणि एक लाख ५० हजार रुपये रोख असणारी महिलेची पर्स चोरीला गेली होती. याबाबत राजापेठ पोलिसात तक्रार दाखल झाली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना २६ फेब्रुवारीला बडनेरा मार्गावरील व्हाईट हाऊस येथे आयोजित लग्न सोहळ्यातून चांदीचे १० शिक्के, दोन मोबाईल आणि २० हजार रुपये रोख चोरीला गेले होते.
दीपार्चन येथील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता काही अल्पवयीन मुले पर्स लपवत असल्याचे आढळले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अरुण इंगळे, हेड कॉन्स्टेबल रंगराव जाधव, फिरोज खान, किशोर आंबूलकर, छोटेलाल यादव, राजेश गुरुले आणि दिनेश भिसे यांनी अल्पवयीन चोरटय़ांचा शोध घेतला.
याप्रकरणी विलास नगर परिसरातील चौघांना ताब्यात घेतले. यापैकी तिघे हे अल्पवयीन आहेत तर सूरज परमार (२१) हा सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले. या चौघांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली असता लग्न सोहळ्यात सहभागी होऊन लग्नात वधू वरांना मिळणाऱ्या भेटवस्तू, पैशांची पाकिटे, महिलांच्या पर्स ही टोळी मोठय़ा शिताफीने पळवत असत. या टोळीने चोरीच्या पैशातून दोन दुचाकी आणि एक मोपेड देखील खरेदी केली होती. चोरीनंतर त्यांनी नागपुरातील एका वॉटर पार्कमध्ये जाऊन एकाच दिवशी नऊ ते दहा हजार रुपये खर्च केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
