पश्चिम कोलकातामधील तारातला येथे बांधकाम सुरु असलेल्या गोदामाचं छत कोसळलं आहे. दुपारी 12 वाजता अचानक छत कोसळून दुर्घटना घडली आहे. येथे काम करणारे अनेक कामगार मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलीस, आपत्ती व्यवस्थापन दल (DMG), नागरी संरक्षण आणि अग्निशमन दलाची पथकं घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु कऱण्यात आलं आहे. आतापर्यंत 4 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराताला भागातील ‘ब्रेस ब्रिज’जवळील ‘ट्रान्सपोर्ट डेपो रोड’वर एका गोदामाचं बांधकाम सुरू होतं. बुधवारी दुपारी कामगार नेहमीप्रमाणे काम करत असतानाच, अचानक छताचा एक मोठा भाग कोसळला. यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली आणि गोंधळ उडाला.
