पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले; ‘मरे’ची वाहतूक खोळंबली

कल्याणजवळ मनमाड-पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन तीन ते चार डबे घेऊन पुढे गेली, तर इतर डबे मात्र मागेच राहिले. कल्याणच्या पत्री पुलाच्या आसपास हा प्रकार घडला कपलिंग तुटले तेव्हा गाडीला मोठा झटका बसल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. दरम्यान, रेल्वेचे डबे आहेत त्याच जागी असून परिस्थितीत काहीही सुधारणा झालेकली नसल्याचे समजते.

दरम्यान, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने सुरू आहे. याबरोबरच सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे जाणवत आहे. कपलिंग तुटण्याची ही घटना दुसऱ्यांदा घडली आहे. गेल्या वर्षी दिवा-डोंबिवली मार्गावरही कपलिंग तुटल्याची घटना घडली होती. दरम्यान, मनमाड-पंचवटी एक्स्प्रेसने मुंबईला निघालेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याचे लक्षात आल्याने प्रवाशांनी गाडीतून खाली उतरत काही प्रवाशांनी ठाकुर्ली स्टेशन गाठले, तर काहींनी कल्याण स्टेशनकडे धाव घेतली. तर काही मिळेल त्या वाहनाने इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *