वसई किल्ल्यातील नरवीर चिमाजी अप्पा यांच्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकाची डागडुजी झाली नसल्याने स्मारक कोसळण्याच्या अवस्थेत आहे. महापालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणजे वसई किल्ला. या ऐतिहासिक किल्ल्यात नरवीर चिमाजी अप्पा यांचे स्मारक तयार करण्यात आले. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच हे स्मारक आहे. मात्र या स्मारकाची गेली अनेक वष्रे डागडुजी झाली नसल्याने हे स्मारक कोसळण्याच्या स्थितीत आहे. स्मारक ज्या चौथऱ्यावर उभे आहे, तो पडण्याच्या स्थितीत आहे. त्याचे प्लास्टर ऑफ पॅरिस निघालेले असून सळयाही बाहेर आल्या आहेत. त्याशिवाय स्मारकाला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहे. अनेक ठिकाणी रंगही उडालेला आहे.
हे स्मारक महापालिकेने बांधले असले तरी त्याचे त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. किल्ल्यामध्ये विकास करण्यासाठी महापालिकेने वेगवेगळय़ा तरतुदी केल्या. मात्र या स्मारकाची डागडुजी करण्याबाबत मात्र काणाडोळा करण्यात आलेला आहे. या स्मारकाची माहिती देणारे माहिती फलकही याठिकाणी लावलेले नाही, असे इतिहासप्रेमींकडून सांगण्यात आले. या स्मारकाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन या स्मारकाची डागडुजी करावी, अशी मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे.
चिमाजी अप्पा स्मारकाच्या डागडुजीसंदर्भातील प्रास्ताविक तयार आहे. स्मारकाची पाहणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून काही मंजुऱ्या बाकी आहे. मंजुरी मिळाली की काम सुरू करू.
