जनतेचे रक्षण करणारे पोलीस हैवान आहेत का असा प्रश्न उपस्थित करणारी घटना कोल्हापुरात घडली आहे.
कोल्हापुरातल्या एका पेट्रोलपंपावर झालेल्या चोरीची कबुली वदवून घेण्यासाठी, 4 कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण आणि छळ केल्याचा आरोप पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.
इतकंच नाही तर, एका तरुणाच्या गुप्तांगामध्ये केमिकलचं इंजेक्शन टोचल्याचा दावाही पीडित तरुणांनी केला आहे.
छळ झालेल्या चारपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय आहे प्रकरण?
8 जुलै रोजी महामार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपावर ट्रकमधून चोरी झाली. ट्रक मालकानं चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशीसाठी पेट्रोलपंपावरच काम करणाऱ्या 4 तरुणांना उचललं आणि गजाआड केलं.
त्यानंतर या चौघांवर अत्याचार सुरु झाले. या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी आरोपींच्या गुप्तांगामध्ये केमिकलची इंजेक्शन दिल्याचाही ठपका पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.
न केलेली चोरी पोलिस बळजबरीने वदवून घेत असल्याचा दावा पीडित तरूणांनी केला आहे.
दरम्यान या प्रकरणी पीडित तरुणांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण पोलिसांनी मात्र या प्रकरणी चकार शब्द काढण्यासही नकार दिला आहे.
