मुंबई महाराष्ट्रासह देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडसारखीच आणखी एक धक्कादायक घटना मानखुर्द येथे उघडकीस आली आहे. मानखुर्द येथे राहणाऱ्या एकल महिलेला ठार करून तिचा मृतदेह रायगड जिल्हातील माणगावमध्ये पुरण्यात आला. तीन महिन्यानंतर या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी महिलेच्या विवाहित प्रियकरासह दोघांना मानखुर्द पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात रोहिणी घोरपडे (२८) ही एकल महिला काम करत होती. मानखुर्द येथे आपल्या नऊ वर्षांच्या मुलीसह ती राहत होती. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी मैत्रिणीच्या लग्नाला जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली रोहिणी परतलीच नाही. तिच्या भावाने याबाबत मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार केली. मानखुर्द पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन बोबडे यांच्या पथकाने या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिचे फोनकॉल रेकार्ड तपासले, परंतु काहीच माहिती मिळत नव्हती. पोलिसांचे पथक वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात गेले. रोहिणी आणि याच रुग्णालयात काम करणाऱ्या सुनील शिर्के यांचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिर्के याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून काहीच ठोस हाती लागले नाही आणि पुरावे नसल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले.
रोहिणीच्या बँक खात्याचा तपशील काढण्यासाठी पोलिसांनी बँक गाठली. १५ आणि १६ नोव्हेंबरला वाशी आणि कोपरखैरणे येथील एटीएम सेंटरमधून रोहिणीच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे समजले. पोलिसांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी एक इसम पैसे काढत होता. त्याचा शोध घेत असताना त्याचे नाव रामचंद्र जाधव असून तो नवी मुंबईत केबल ऑपरेटर असल्याचे कळले. शिर्के आणि जाधव यांची समोरासमोर चौकशी केली, त्यावेळी त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांना साथ देणाऱ्या विजयसिंग मोरे यालाही अटक करण्यात आली.
आधीच खड्डा खणून ठेवला
सुनील शिर्के हा विवाहित असून त्याला दोन मुलगे आहेत. रोहिणी आणि त्याच्या विवाहबाह्य संबंधांबाबत समजल्याने शिर्के आणि त्याच्या पत्नीमध्ये रोज भांडण होई. रोहिणीचा कायमचा काटा काढण्यासाठी त्याने जाधव याला ११ नोव्हेंबरला माणगावला पाठवले आणि खड्डा खणून ठेवण्यास सांगितले. शिर्के आणि मोरे हे दोघे रोहिणीला कारमध्ये घेऊन निघाले. कारमध्येच तिची हत्या करून जाधव याने खणलेल्या खड्ड्यात तिला पुरण्यात आले.
