घाटकोपरमध्ये सर्वसामान्यांची लुबाडणूक
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या ‘क्लीन अप मार्शल’बाबत तक्रारी येत असतानाच, घाटकोपरमध्ये तोतया ‘मार्शल’ची एक टोळीच सक्रिय झाल्याचे समोर येत आहे. रस्त्यावर कचरा केल्याचे सांगत हे तोतया मार्शल पादचाऱ्यांकडून पाचशे ते सातशे रुपयांचा दंड उकळत आहेत. काही नागरिकांना या मार्शलकडून मारहाण झाल्याच्याही तक्रारी येऊ लागल्याने महापालिकेच्या वतीने पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
रेल्वे स्थानक, एसटी डेपो, बाजारपेठ , मंडई अशा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून २००७ पासून ‘क्लीन अप मार्शल’ योजना राबविली जात आहे. मात्र घाटकोपरमध्ये तोतया क्लीन अप मार्शल रहिवाशांची लूट करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला ही तीन ते चार जणांची टोळी नागरिकांना लुटत आहे. हे तोतया दिवसभर या परिसरात फिरत असतात. गरीब किंवा साधीभोळी माणसे हेरून स्वत:ला क्लीन अप मार्शल असल्याचे सांगत दमदाटी करतात. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे, थुंकणारे यांना पकडून त्यांच्याकडून दंड म्हणून पैसे काढले जातात. अर्थात या पैशाची पावती दिली जात नाही. जर एखाद्या व्यक्तीने विरोध केल्यास त्याला मारहाणदेखील करण्यात येत असल्याची माहिती येथील एका दुकानदाराने दिली.
ही टोळी मागील अनेक दिवसांपासून घाटकोपर पूर्व आणि पश्चिम दिशांना कार्यरत आहे. दिवसाढवळ्या स्थानक परिसरात अशा टोळ्यांचा सुळसुळाट कसा काय होता, असा प्रश्न येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांने केला. काहींनी या तोतयांचे फोटोही काढले आहेत. रहिवाशांनी सुरुवातीला केलेल्या तक्रारींकडे पालिकेने दुर्लक्ष केले. मात्र वारंवार तक्रारी येऊ लागल्याने पालिकेला याची गंभीर दखल घ्यावी लागली आहे. पालिकेच्या एन विभागाने आता या संबंधात पंतनगर पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पंतनगर पोलीस या तोतयांचा शोध घेत आहेत.