भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची स्वीडन या देशाच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्या महिन्यात स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतलेले सोशल डेमोक्रॅटिक पार्टी- ग्रीन पार्टी या पक्षांच्या आघाडीचे नेते स्टीफन लोफवन यांच्यासोबत त्या काम करतील. बत्तीस वर्षीय नीला या ख्यातनाम शिक्षण ज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.
‘नीला हिची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात अर्थ विभागाची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घरबांधणी या संदर्भात ती काम करेल,’ अशी माहिती नीला यांचे वडील अशोक विखे पाटील यांनी दिली. स्वीडनची राजधानी स्टॉकहोमच्या महापालिकेवरही नीला या निवडून गेल्या आहेत.
स्वीडनमधील याआधीच्या सरकारच्या कारकिर्दीतही नीला विखे पाटील या पंतप्रधान कार्यालयाच्या राजकीय सल्लागार होत्या. स्वीडनमधील ग्रीन पार्टीच्या सक्रिय सदस्य असलेल्या नीला या पक्षाच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत असून स्टॉकहोम विभागाच्या निवडणूक समितीमध्ये सदस्य आहेत, अशी माहिती अशोक विखे पाटील यांनी दिली.
स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला विखे पाटील यांनी प्रारंभीची काही वर्षे भारतात वास्तव्य केले आहे. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात असून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे पाटील यांची त्या पुतणी आहेत. नीला यांनी पदवीनंतर गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून इकॉनॉमिक्स आणि लॉ या विषयांसह एमबीए केले असून माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.