सिव्हिल रुग्णालयातून आरोपींनी पळ काढल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा समोर आलेले आहेत. मात्र मंगळवारी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी आलेला एका १५ वर्षांचा मुलगा रुग्णालयातील एक्सरे वार्डमधून पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरपीएफ आणि ठाणे पोलिसांनी संयुक्तरित्या मुलाचा शोध घेत या मुलाला मिरा-भाईंदरमधून पुन्हा ताब्यात घेतले आहे. मात्र या मुलाविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
भाईंदरच्या रेल्वे सुरक्षा बलाने या बालकाला एका गुन्ह्यात रविवारी ताब्यात घेतले होते. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी सोमवारी भिवंडीतील बाल न्याय मंडळाच्या पुढे हजर केले. मात्र मुलाच्या वयाबाबत पुरावा नसल्याने मुलाची वैद्यकीय तपासणी करून पुरावा सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी बालसुधारगृहातून मुलाला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात आणले होते. रुग्णालयात आल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पोलिस मुलाला घेऊन एस्करे काढण्यासाठी रुग्णालयातील वार्ड क्रमांक १४ मध्ये गेले. यावेळी मुलासोबत असलेल्या हवालदाराला येथील कर्मचाऱ्यांनी बाहेर जाण्यास सांगितले. हवालदार बाहेर गेले आणि एक्सरे रूममधील कर्मचारी कामात व्यस्त असल्याचे पाहून मुलाने रूममधील खिडकीतून बाहेर उडी मारून धूम ठोकली. पोलिसांना ही बाब कळताच पोलिसही पकडण्यासाठी मागोमाग धावू लागले. रुग्णालयाच्या आवारातील लोकांनीही मुलाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा मुलगा रुग्णालयाच्या मागील तट भिंतीवरून उडी मारून पळून जाण्यास यशस्वी झाला. आरपीएफने ठाणे रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात मुलाचा शोध घेतला. मात्र सापडला नाही. अखेर याप्रकरणी आरपीएफने ठाणेनगर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ठाणे पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला. पहाटे हा मुलगा मिरा-भाईदरमध्ये मिळाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा मुलगा मिरारोड परिसरातच राहणारा आहे.