मुंबईच्या उद्योजकाचं अयोध्येत गुप्तदान! 175 किलो सोनं केलं दान; 150 कोटींचं हे सोनं वापरलं कुठे?

अयोध्येतील राम मंदिर 2024 मध्ये झालेल्या लोकार्पणापासून भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. केवळ भारतच नाही तर परदेशातूनही मोठ्या संख्येनं या ठिकाणी पर्यटक मंदिराला भेट देताना दिसत आहेत. मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी भाविकांची राम दर्शनाची आस अद्यापही कमी झालेली नाही. आजही अयोध्येत लाखो भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत. सन 2025 च्या अखेरपर्यंत राम मंदिर परिसरातील सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र सध्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात दान केलं जातं. यातच मुंबईतील एका उद्योजकाने या मंदिरात महादान केल्याची माहिती समोर आली आहे. या बड्या उद्योजकाने राम मंदिरासाठी तब्बल 175 किलो सोने अर्पण केले आहे. परंतु, हे गुप्त दान केले असून, देणाऱ्याचं नाव आणि त्याची माहिती उघड करण्यात आलेली नाही.

150 कोटींचं सोनं

अयोध्येतील राम मंदिराला पैशांच्या स्वरुपात आणि सोने-चांदी स्वरुपात दान करणाऱ्या भाविकांची यादी हजारोंच्या घरात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवरून एका भाविकाने महादान दिले आहे. मुंबईतील एका उद्योजकाने राम मंदिराला सुमारे 175 किलो सोने दान केले आहे. या सोन्याची किंमत सुमारे 150 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.

कुठे वापरलं हे सोनं?

उद्योजकाने दान केलेले सोने राम मंदिराच्या शिखर-कलशापासून ते दरवाजे आणि दाराच्या चौकटीपर्यंत वापरले गेले आहे. राम मंदिराच्या शिखरासह परिसरातील सहा मंदिरांचे शिखर-कलश सोन्याने सुशोभित केले आहेत. शेषावतार मंदिराच्या शिखराला सोन्याने सुशोभित करण्याचे काम अजूनही सुरू आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे निमंत्रित सदस्य आणि मंदिर बांधकामाचे प्रभारी गोपाळ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 175 किलो सोने देणाऱ्या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे.

दहा कोटी देतो, माझं नाव द्या म्हणणाऱ्याची मागणी ट्रस्टने फेटाळली

दुसरीकडे, एका भाविकाने दहा कोटी रुपये दान केल्यानंतर निर्माणाधीन प्रेक्षागृहाला आपले नाव द्यावे, अशी अपेक्षा ठेवली आहे. परंतु, ही बाब श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून फेटाळ्यात आली आहे. यापूर्वीही अनेकांनी दहा कोटींहून अधिक रुपयांचे दान दिले आहे. परंतु, कोणाचेही नाव कोणत्याही ठिकाणी देण्यात आलेले नाही.

वर्षभरात किती कोटींचं दान मिळालं?

दरम्यान, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला 2024-25 मध्ये विविध स्त्रोतांकडून 316.57 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या काळात श्रीराम मंदिर प्रकल्पाशी संबंधित बांधकाम कामावर सर्वाधिक 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तीर्थक्षेत्राच्या विश्वस्तांच्या बैठकीत सादर केलेल्या उत्पन्न आणि खर्चाच्या अंदाजपत्रकावरून ही माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *