ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन ऊसतोड मजुराच्या तीन वर्षीय मुलाचा चिरडून मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त झालेल्या ऊसतोड मजुरांच्या मारहाणीत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे घडली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोहम कन्हैयालाल मोरे (वय ३) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. तर मजुरांच्या मारहणीत मृत पावलेल्या चालकाचे नाव अक्षय थोरात आहे. या घटनेमुळे उक्कलगाव परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
अधिक माहिती अशी, उक्कलगाव येथे रस्त्याच्या कडेला ऊसतोड मजुरांच्या झोपड्या आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला मजुरांची लहान मुले खेळत होती. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडून सोहम मोरे जागीच ठार झाला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर मजुरांनी ट्रॅक्टर चालक अक्षय थोरातला त्यांच्याकडील कोयते व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत थोरातचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर काही ऊसतोड मजूर पळून गेले. पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले.
