अण्णा, चुकले तर आमचे कान धरा

अण्णा, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. आम्ही चुकलो, तर आमचे कान धरा, पण उपोषण करून आपल्या प्राणांची बाजी लावू नका. तुमचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीच्या ग्रामसभेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे तोंडभरून कौतुक केले. या सभेत बोलताना हजारेही भावूक झाले होते.

उपोषणाची सांगता झाल्यानंतर गावात सभा झाली. या सभेचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री फडणवीस यांनाच देण्यात आले. एखाद्या ग्रामसभेचा अध्यक्ष होण्याची आपली ही पहिलीच वेळ असून कदाचित कोणी मुख्यमंत्रीही प्रथमच ग्रामसभेचा अध्यक्ष झाला असेल. त्यामुळे या सभेच इतिवृत्त आपल्याला पाठवून द्यावे, आपण ते सांभाळून ठेवू, असे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच सांगितले. ते म्हणाले, ‘अण्णांच्या ज्या मागण्या आहेत, त्या स्वत:साठी नाही तर देशासाठी आहेत. त्यांनी आंदोलन करून आम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडले. जोपर्यंत अण्णा माघार घेणार नाहीत, तोपर्यंत रागळेगणसिद्धी सोडणार नाही, असे आम्ही ठरवूनच आलो होतो. त्यामुळे प्रदीर्घ काळ चर्चा चालली तरी समाधान करूनच जात आहोत, याचा आनंद आहे. त्याबद्दल हजारे आणि ग्रामस्थ यांचेही धन्यवाद.’

हजारे म्हणाले, ‘आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे आज आपण जिवंत आहोत. या वेळी काहीही झाले तरी माघार घ्यायची नाही, असे आपण ठरविले होते; मात्र, समाधानकारक तोडगा निघाल्याने माघार घेतली. आता आपण आपल्या डोळ्यांनीच सरकारने निर्णय घेतल्याचे पाहणार आहोत, याचे समाधान वाटते. ग्रामस्थ आणि देशातील जनतेचे आपण आभारी आहोत. त्यांनी साथ दिल्यानेच आंदोलन यशस्वी झाले.’ या वेळी हजारे यांच्या डोळ्यांत आश्रू तर‌ळले.

सभेचे प्रास्ताविक सुरेश पठारे यांनी केले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री सोमपाल शास्त्री यांचीही या वेळी भाषणे झाली. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. अण्णांसोबत उपोषण केलेले लाभेश औटी यांच्या उपोषणाचीही या वेळी सांगता करण्यात आली.

तो प्रोटोकॉल बदलणार : मुख्यमंत्री

सोमवारी झालेल्या मोर्चाच्या वेळी जिल्हाधिकारी राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आले नव्हते. त्यावरून सोमवारच्या सभेत निषेधाचा ठराव झाला. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘यासंबंधीचा नियम बदलण्यात येईल. लवकरत परिपत्रक काढून यात सुधारणा करण्यात येईल. लोकहिताच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांना अधिकाऱ्यांनी सामोरे गेले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. यासंबंधीचा जुना नियम बदलण्यात येणार आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *