मी मुंबई बोलतेय… याकूबच्या दगाबाजीवर मुंबईचं मनोगत…

मी मुंबई बोलतेय… याकूबच्या दगाबाजीवर मुंबईचं मनोगत…

ज्या मुंबईमध्ये याकूब जन्मला… त्याच मुंबईशी त्यानं दगाबाजी केली… आणि त्याची परिणिती फाशीमध्ये झाली… पण याकूबनं मुंबईशी बेईमानी केली असली, तरी या मुंबईनं मात्र त्याच्याशी इमानच राखलं… पाहुयात याकुबच्या फाशीवर मुंबईचं मनोगत…

मी मुंबई आहे.

सुखी होते मी.

कधीकाळी 7 बेटांची नगरी म्हणून ओळखले जायचे…

पण सायबांनी माझं सोनं केलं…

उलाढाल वाढली… व्यापार वाढला… बंदरामुळे जगाशी जोडले…

मी महानगरी झाले.

माझ्याच अंगाखांद्यावर खेळून लोक मोठे झाले… मी देशाचा मुकुटमणी झाले.

गर्दी वाढली.. जो येईल त्याला सामावून घेऊ लागले… त्याची मी ना जात पाहिली ना पात पाहिली.

याकूबही माझ्याच समोर जन्मला… माझ्याच अंगाखांद्यावर खेळून मोठा झाला…

सीए बनला… पण माहित नाही, अचानक काय झालं…

माझ्यावर अभिमान बाळगणारा याकूब माझाच वैरी झाला…

आपल्या भावासह त्यानं मलाच उद्ध्वस्त करण्याचा कट रचला…

12 मार्च 1993 चा दिवस होता तो…

माझ्याच अंगावर याकूबनं 12 ठिकाणी बॉम्ब पेरले…

आणि माझी लेकरं बेसावध असताना, याकूबनं माझ्या अवयवांच्या चिंधड्या उडवल्या.

माझ्याच लेकरानं माझा विश्वासघात केला.

याकूब आणि त्याच्या साथीदारांनी माझी 257 लेकरं मारली गेली.. 700 हून अधिक पोरं जायबंदी झाली. माझी शेकडो लेकरं अनाथ झाली. माझी अनेक घरं उद्ध्वस्त झाली.

मी घायाळ झाल्यानं अवघा देश हादरला…

याकूब परदेशात पळून गेला. पण त्याच्या कर्मानं त्याला गजाआड केलं.

याकूबला फाशी होणार ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली..

मी तटस्थ होते. कारण माझ्याच एका लेकरानं माझ्याच अनेक लेकरांची हत्या केली होती.

30 जुलै 2015…. 22 वर्षांपूर्वी ज्यानं विश्वासघात केला… त्याला त्याची शिक्षा मिळाली..

माझ्या अंगाखांद्यावर खेळलेल्या याकुबला कोण पोटात घेणार हे कळत नव्हतं..

अखेर निर्णय झाला… जिथं तो जन्मला… तिथंच त्याचा शेवट होणार होता…

त्यानं मला दगा दिला… त्यानं मला घायाळ केलं… त्यानं मला अपार दुःख दिलं..

पण म्हणून मी त्याचा द्वेष कधीच केला नाही… उलट मी त्याला माझ्याच उदरात घेतलं

कारण मी एक आई आहे… मुंबईकरांची आई… ज्यांचं मन आभाळाइतकं विशाल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *