पैशांच्या हव्यासापोटी वडिलांनी आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीचा निकाह भोंदूबाबाशी लावून दिल्यावर या बाबाने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. हा बाबा निकाहनंतर पैशाचा पाऊस पाडतो, अशी बतावणी पीडित मुलीच्या वडिलांकडे काही जणांनी केली होती. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी मुलीच्या बापासह भोंदूबाबाला अटक केली आहे.
भिवंडी येथील बाबा सलीम अन्सारी हा जादूटोण्याने पैशांचा पाऊस पाडतो, मात्र त्यासाठी अविवाहित मुलीशी त्याचा निकाह करावा लागेल, पैसा मिळाल्यावर काही वेळातच बाबा तलाक देतो, असे या मुलीच्या वडिलांना सांगण्यात आले होते. पैशांसाठी या बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पीडीत मुलीच्या वडिलांनी तिला निकाहासाठी प्रेरीत केले.
बरेच दिवस वाट पाहिल्यावरही बाबा पैसे देत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले व त्यानंतर तिने जवळच्या एका नातेवाइकाला या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी याबाबत तिच्या वडिलांना सांगितल्यावर अखेर शांतीनगर पोलिसांकडे मुलीनेच फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन बाबा अन्सारी व इतर ४ आरोपींना अटक झाली. यामध्ये मुलीच्या वडिलांचाही समावेश असल्याची माहिती सीनिअर इन्स्पेक्टर आर. डी. शिंदे यांनी दिली.

