गर्भवती कुत्रीला मारणे बदलापुरातील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या मारहाणीमुळे गर्भवती कुत्रीच्या पोटातील पिल्लाचा मृत्यू झाला असून संबंधित महिलेवर बदलापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर पश्चिम भागात असलेल्या शनिनगर परिसरात ही घटना घडली. येथील हरिओम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आश्लेषा कुलकर्णी घरात १० भटक्या कुत्र्यांची सुश्रूषा करतात. यापैकी एका पांढऱ्या गर्भवती कुत्रीला शेजारी राहणाऱ्या चेतना अमित गुजरे यांनी सोमवारी इमारतीच्या गेटमध्ये काठीने मारहाण केली. यावेळी गर्भवती कुत्रीच्या पोटावर काठी लागली आणि दोन दिवसांनी ९ जानेवारीला या कुत्रीने मृत पिल्लाला जन्म दिला. यानंतर पिल्लाचा मृत्यू चेतना गुजरे यांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाल्याचा आरोप करत कुलकर्णी यांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात धाव घेतली.
अशाचप्रकारे काही दिवसांपूर्वी अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एका बंद कंपनीत अजगर आढळला होता. यावेळी घाबरलेल्या सुरक्षारक्षकांनी या अजगराला मारून टाकले होते. त्यानंतर कंपनीच्या ५ सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल करत वनविभागाने त्यांना अटक केली होती.
