10 वर्षांपूर्वी, 2016 मध्ये वर्षांच्या एका 24 फिजिओथेरपिस्टवर तिच्याच घरात बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावलेल्या देबाशीष धाराची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर कायद्यानुसार उच्च न्यायालयाची पुष्टी मिळवणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने यासाठी याचिका दाखल केली होती.
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 आणि 6 डिसेंबर 2016 च्या मध्यरात्री हा सारा प्रकार घडला होता. आरोपीने तरुणीच्या खोलीत शिरकाव करून तिच्यावर अत्याचार केले आणि गळ्याभोवती जीन्सची पँट बांधून तिची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहावर पुस्तके ठेवून ती पेटवून देण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. नेमका प्रकार समोर आल्यानंतर सर्वांना मोठा धक्काच बसला होता. या घटनेनंतर जवळपास दोन महिन्यांनी, 28 जानेवारी 2017 रोजी आरोपीला पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती.
दोषी ठरवले पण आता…
सत्र न्यायालयाने सप्टेंबर 2019 मध्ये पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या धारा याला हत्या, बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार आणि घरात घुसखोरी या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये हा गुन्हा ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ श्रेणीत धरून त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाने आरोपीचे वर्तन अत्यंत पाशवी, विकृत आणि क्रूर असल्याचे नमूद करत या घटनेने समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीला हादरवून सोडल्याचे निरीक्षण नोंदवले होते. मात्र, उच्च न्यायालयाने आता या प्रकरणातील सर्व पुरावे व कायदेशीर बाजू विचारात घेऊन आरोपी धाराची फाशीची शिक्षा रद्द करत त्याची सर्व आरोपातून मुक्तता केली आहे. आरोपी विरोधात ठोस पुरावे न मिळाल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
