मुंबई महापालिका मुख्यालयासह सर्व २६ वॉर्डांमधील उपाहारगृहांतील खाद्यपदार्थांचे दर ऑक्टोबरनंतर वाढणार आहेत. नाश्ता, जेवण आणि थंड पेयांच्या दरात १ रुपयापासून २० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. या उपाहारगृहाचे कंत्राट ऑक्टोबरमध्ये संपत असून निविदा प्रक्रियेतून नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे.
तीन वर्षांत खाद्यपदार्थांच्या दरात वाढ नाही
मुख्यालयातील मोठ्या उपाहारगृहाप्रमाणेच २६ वॉर्डांमध्येही लहान उपाहारगृहे आहेत. प्रत्येक वॉर्डसाठी स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त केला जातो. गेल्या तीन वर्षांत खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे आता दर दहा टक्क्यांहून अधिक वाढवले जाणार आहेत. या दरवाढीत मेदू वडा, भजी, मिसळ, उत्तप्पा, वडा, पोहे, शिरा, ढोकळा, व्हेज सँडविच आणि दही वडा आदी पदार्थांचा समावेश आहे.
नॉनव्हेज पदार्थांच्या किमतीतही वाढ
सध्या या पदार्थांचे दर १२, १८, २४ आणि ३० रुपये आहेत. १५० मिली चहाचा दर १२ रुपयांवरून १०० मिलीमागे १० रुपये होणार आहे. मुख्यालयातील साध्या जेवणाचा दर ३० रुपयांवरून साधारण ४० रुपये, तर ४८ रुपयांची डिलक्स थाळी १५ ते २० रुपयांनी महागणार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांच्या किमतीतही वाढ होणार आहे.
घाटकोपरमधील उपाहारगृहचालकाकडून पाहणी
मुख्यालयातील उपाहारगृहातील स्वयंपाकगृहात माशांचा प्रादुर्भाव आणि अन्न हाताळणी परिसरातील अपुरी स्वच्छता यांसह ३१पैकी सर्व त्रुटी कायम असल्याने जुलैमध्ये उपाहारगृह सील करण्यात आले होते. त्यानंतर दंड भरून आणि नियमावलींची पूर्तता केल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले.
कंत्राट ऑक्टोबरमध्ये संपणार
या पार्श्वभूमीवर दरवाढीच्या निर्णयाची चर्चा होत असतानाच, घाटकोपरमधील एका मोठ्या उपाहारगृहचालकाने मुख्यालयातील उपाहारगृहाची पाहणी करून त्यात रुची दाखवली आहे. त्यामुळे नव्या कंत्राटदाराच्या नियुक्तीपूर्वीच या चालकाची चर्चा महापालिकेत रंगली आहे. मुख्यालयातील उपाहारगृहाचे सध्याचे कंत्राट ऑक्टोबरमध्ये संपत आहे.
त्यानंतर निविदा काढून नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच घाटकोपरमधील एका मोठ्या उपाहारगृहचालकाने मुख्यालयातील उपाहारगृहाची पाहणी केली आहे. त्यामुळे महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
