सहलीसाठी पन्हाळा येथे जाणारी क्रुझर गाडी आंबेवाडी चिखली फाटा येथे पलटी झाल्याने ९ मुले जखमी झाली. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये दोन मुले गंभीर असून ७ जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंबलाईवाडी येथील लाठीकाठी प्रशिक्षणाचा ग्रुप सहलीसाठी पन्हाळा येथे जात होता. चिखली फाटा येथे चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने क्रुझर गाडी रस्त्याच्यापलीकडे उलटली. रस्त्यापासून ही गाडी सुमारे दहा ते पंधरा फूट फरफरट गेली. या अपघातात ९ मुले जखमी झाली असून सर्व मुले ११ ते १४ वयोगटातील आहेत. अचानक झालेल्या घटनेने रस्त्यावरील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली.
