पंजाबच्या गुरूदारपूरमध्ये धुडगूस घालणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले असल्याचे प्राथमिक पुराव्यांतून स्पष्ट झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी राज्यसभेत दिली. गुरूदारपूर हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत निवेदन सादर केले. गुरूदासपूरमध्ये बेछुट गोळीबार करीत पोलीस ठाण्यात घुसून थैमान घालणारे तीन दहशतवादी पाकिस्तानातून रावी नदीमार्गे आले होते, असे राजनाथ यांनी सांगितले. देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱया दहशतवादी कारवायांना भारत चोख प्रत्युत्तर देईल याचाही राजनाथ यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
…तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ- राजनाथ सिंह
दरम्यान, राजनाथ सिंह राज्यसभेत निवेदन सादर करीत असताना काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला. सभागृहाच्या मोकळ्या जागेत येऊन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
पंजाबच्या गुरूदारपूरमध्ये सोमवारी तीन दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सहा जण मृत्युमुखी पडले होते. यामध्ये एका पोलीस अधीक्षकांसह तीन पोलीसांचा आणि तीन सामान्य नागरिकांचा समावेश आहे. ११ तासांच्या संघर्षानंतर तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले होते.
पंजाबमध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले- राजनाथ सिंह

