प्रियकराला घरी बोलावून केले तुकडे आणि शिजवली बिर्याणी

एका महिलेने तिच्या प्रियकराला घरी बोलावलं, त्यानंतर त्याचा खून केला आणि मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. ही महिला एवढ्यावरच थांबली नाही, तिने मृतदेहाच्या तुकड्यांची बिर्याणी बनवली आणि जवळच बांधकाम करणाऱ्या कामगारांना खायला दिली. संयुक्त अरब अमीरातमधील अल अइन शहरामध्ये ही अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

का केला खून ?
आरोपी महिला आणि एका तरुणाचे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण काही महिन्यांपूर्वी तरुणाने मोरोक्को येथील एका तरुणीसोबत लग्न करणार असल्याचं आरोपी महिलेला सांगितलं होतं. त्यामुळे बदला घेण्यासाठी तिने त्याचा खून केला. तीन ते चार महिन्यांपूर्वी ही हत्या केली, मात्र याचा खुलासा आता झाला आहे. मृत तरुणाचा भाऊ त्याचा शोध घेण्यासाठी आरोपी महिलेच्या घरी पोहोचला आणि त्याने आपल्या भावाबाबत तिला विचारणा केली. त्यावेळी मला त्याच्याबाबत काहीही माहिती नाहीये असं ती महिला म्हणाली. पण, तिच्या घरामधील मिक्सर-ब्लेंडरमध्ये मृत तरुणाच्या भावाला मानवी दात अडकलेला दिसला आणि त्याचा संशय बळावला. त्यानंतर त्याने थेट पोलीस स्थानक गाठलं आणि संबंधित प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आणि दाताची डीएनए टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर तो दात मृत तरुणाचाच असल्याचं स्पष्ट झालं. मात्र, महिलेने त्याचा खून कसा केला याबाबत पोलिसांनी माहिती दिलेली नाहीये. सुरूवातीच्या चौकशीत या महिलेने पोलिसांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा त्याने मला दुसऱ्या महिलेशी लग्न करणार असल्याचं सांगितलं त्याचवेळी मी त्याला लाथ मारुन घराबाहेर हाकललं, त्यानंतर मी त्याला परत पाहिलं नाही असं तिने पोलिसांना सांगितलं होतं. पण नंतर पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरूवात केल्यावर तिने खुनाची कबुली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *