अंबरनाथमध्ये चोरट्यांचा प्रताप ! चक्क अंड्यांचा ट्रकच पळवला

चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील मात्र, अंबरनाथमध्ये चक्क अंड्यांनी भरलेला ट्रक चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या ट्रकमध्ये 5 लाख रुपये किमतीची 1 लाख 41 हजार नग अंडी होती, अशी माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

अंबरनाथ येथे असलेल्या महाराष्ट्र एग्ज सेंटरमध्ये अंडे पोहोचवण्यासाठी कर्नाटकच्या बिदर भागातून एक अंड्यांनी भरलेला ट्रक येत होता. शनिवारी मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास हा ट्रक अंबरनाथच्या टी सर्कलजवळ येताच एक कार मागून येऊन या ट्रकच्या पुढे थांबली. कारमधून चार जणांचं टोळकं उतरलं आणि त्यांनी ट्रकचालक मोहम्मद शेख आणि त्यांचा मुलगा मुजम्मिल यांना मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि डोळ्यांना पट्टी बांधून टिटवाळ्याजवळच्या रायता गावाजवळ जंगलात नेऊन सोडून दिलं. त्यांच्याजवळचा मोबाईल आणि पैसेही चोरट्यांनी काढून घेतले. तर इतर साथीदारांनी अंड्यांनी भरलेला ट्रक घेऊन पलायन केलं.

या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *