बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका लेक तैमुर जन्माला आल्यापासून स्टारडम उपभोगत आहे. आई-वडीलांप्रमाणेच किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त लोकप्रियता तैमुरला मिळत आहे.त्याच्या याच लोकप्रियतेमुळे बाजारात त्याच्यासारखं हुबेहूब दिसणारी खेळणी आली आहे. तैमुरसारखी खेळणी बाजारात आल्यानंतर पहिल्यांदाच सैफने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
केरळमधील एका दुकानामध्ये तैमुरसारखा दिसणारा बाहुला विक्रीसाठी ठेवण्यात आला असून या बाहुल्याचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे हा बाहुला पाहिल्यानंतर तो मलाही आणून द्या असं सैफने म्हटलं आहे.
‘तैमुर केवळ आमचाच नाही तर चाहत्यांचाही लाडका आहे. त्याची लोकप्रियताही वाढत आहे. खरंतर त्याला एवढ्या लहान वयात मिळत असलेली लोकप्रियता पाहून आम्हाला खरंच आनंद होतो. आता त्याच्या सारखं खेळणही बाजारात आलं आहे हे तर थक्क करणारंच आहे. पण हे खेळणं मलाही हवं आहे. तैमुरसारखा दिसणारा बाहुला मला कोणी आणून दिला तर खरंच फार आनंद होईल’, असं सैफ म्हणाला.
