९ लहान मुलींवर बलात्कार करुन हत्या; अंगावर शहारे आणणारा आरोपीचा जबाब

उत्तर प्रदेशातील गुडगावमधील सेक्टर ६६मध्ये एका ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाने कबुली जबाब दिला आहे. त्याने केलेला खुलासा हा अंगावर शहारे आणणारा असून त्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. ९ लहान मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याची कबूली त्याने चौकशीदरम्यान दिली आहे. गुन्ह्याची त्याची कार्यपद्धतीही सुन्न करणारी आहे.

सुनील असे आरोपीचे नाव असून त्याने केलेल्या हत्याकांडामधील मुलींचे वय ३ ते ८ वर्षे इतके होते. यांपैकी तीन बलात्कार आणि हत्या त्याने गुडगावमध्ये केले असून १ ग्वालियार, १ झाशी आणि ४ दिल्लीत केल्या आहेत. दरम्यान, गुडगाव पोलीस दिल्ली, ग्वालियार, झाशी पोलिसांशी संपर्क करुन या प्रकरणाची माहिती घेत आहेत.

१२ नोव्हेंबर रोजी सकाळी सेक्टर ६६मध्ये एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. ती ११ नोव्हेंबरच्या दुपारपासून घरातून गायब झाली होती. अत्याचारानंतर अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली होती. याचा आरोप जवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या सुनीलवर लावण्यात आला होता. पोलिसांनी त्याचा मेहुणा, बहिण आणि आईकडे याबाबत अधिक चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी रात्री उशीरा झाशी येथील मगरपूर गावातून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

सुनीलने या लहान मुलींवर कशा प्रकारे अत्याचार करीत होता याची माहिती ऐकून अंगावर शहारे येतात. तो लहान मुलींना कुरकुरे किंवा चॉकलेटच्या बहाण्याने निर्मनुष्य जागी नेऊन त्यांचा पाय तोडायचा कारण त्या पळून जाऊ नयेत. त्यानंतर तो त्यांच्यावर अत्याचार करायचा पुढे त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार मारत होता. त्यानंतर तो दारु पिऊन मौज करीत होता. गेल्या दोन वर्षात त्याने अशा प्रकारे ९ चिमुकल्यांवर अत्याचार करुन त्यांना ठार मारले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *