गुरुदासपूर पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात सोमवारी दहशतवादी हल्ला करणारे ते तीन दहशतवादी पाकिस्तानातूनच आले होते, असे या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या जीपीएस यंत्रणेची प्राथमिक तपासणी केल्यावर ही बाब स्पष्ट झाली असून सखोल तपासासाठी ही यंत्रे सध्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत.
हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांच्याजवळून काहीही ठोस पुरावे मात्र सापडलेले नाहीत. या दहशतवाद्यांच्या अंगावर कपडे तसेच त्यांच्या अंतर्वस्त्रांवरील लेबल्स काढण्यात आले होते. शिवाय त्यांच्याकडे थोडा सुका मेवा वगळता काहीही खाद्यपदार्थ किंवा पाणीही नव्हते. त्यामुळे मरण्याच्याच उद्देशाने आलेले हे अतिरेकी पूर्ण तयारी करून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे दहशतवादी ज्या दिनानगर पोलीस ठाण्याच्या इमारतीत लपून बसले होते तेथे मंगळवारी न्यायवैद्यकीय पथकाने भेट दिली. देविंदरपाल सेहगल आणि अश्विनीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती तेथील पुरावे गोळा करून त्यांचा तपास करत आहे.
शिवाय या दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांच्याकडून एके-४७ रायफलींसह चिनी बनावटीचे हँड ग्रेनेडही ताब्यात घेण्यात आले होते. या सगळ्या परिस्थितीजन्य पुराव्यांवरून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचेही पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले असून या प्रकरणी सध्या सखोल तपास सुरू आहे.
बादल यांची पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबतची बैठक रद्द
या दहशतवादी हल्ल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांच्यासोबतची बैठक रद्द केली आहे. २९ जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान अब्दुल बसित हे चंदीगडच्या दौ-यावर येणार होते. यावेळी त्यांची आणि मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांची बैठक होणार होती. मात्र या हल्ल्यानंतर बादल यांनी ही बैठक रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे.

