अब्दुल कलाम यांना जगभरातून आदरांजली

अब्दुल कलाम यांना जगभरातून आदरांजली

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाने जगभरात शोक व्यक्त केला जात आहे. वैज्ञानिक, संशोधक व दक्षिण आशियातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अशा शब्दांत त्यांचा विविध देशांनी गौरव केला.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, वैज्ञानिक व नामवंत राज्यकर्ते यांचे अपूर्व मिश्रण त्यांच्यात होते. दक्षिण आशियातील तरुणांना त्यांच्याकडून कायम प्रेरणा मिळत होती. त्यांच्या निधनाने भारत व अन्य देशांचे मोठे नुकसान झाले. भारताला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर नेण्यात कलाम यांचे मोठे योगदान होते.

तरुणांच्या स्वप्नांना त्यांनी पंख लावले होते. तर लाखो भारतीयांना प्रेरणा देणारे कलाम हे नामवंत व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनापासून आम्ही खूप काही शिकलो आहोत, असे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी म्हणाले.

नेपाळचे पंतप्रधान सुशील कुमार कोईराला यांनीही माजी राष्ट्रपती कलाम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. भारताला वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गावर नेणारे कलाम हे व्यक्तिमत्त्व होते. नेपाळने एक चांगला मित्र गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर कलाम यांच्या जाण्याने भारताच्या वैज्ञानिक समूहाचे फार मोठे नुकसान झाल्याचे मत व्यक्त करत मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही कलाम यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *