नेपाळमध्ये यापुढे साज-या होणा-या कुठल्याही उत्सवांत पशुहत्या करता येणार नसल्याची घोषणा नेपाळ सरकारने मंगळवारी केली आहे.
नेपाळमध्ये सध्या धार्मिक उत्सवांमध्ये बळी देण्याची परंपरा मोठय़ा प्रमाणावर रुजली होती. मात्र यात निष्पाप मुक्या प्राण्यांचा बळी जात असल्याने सरकारने हा निर्णय दिला असून प्राणीहत्येवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करणा-या विविध प्राणीमित्र संघटनांनी सरकारच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.
नेपाळमध्ये प्रामुख्याने साज-या केल्या जाणा-या गधीमाई या जगातील सर्वात मोठय़ा उत्सवात म्हशींचा बळी देण्याची पद्धत आहे.
त्यामुळे या उत्सवात शेकडो म्हशींचा नाहक बळी जात होता. मात्र यापुढे २०१९ साली होणा-या या उत्सवात हे बळी देता येणार नसून त्यामुळे निष्पाप म्हशींचा जीव वाचणार आहे. तर इतरही अनेक उत्सवांत कोंबडय़ा, बकरे यांचा बळी देण्याची पद्धत नेपाळमध्ये रूढ आहे. त्यामुळे भविष्यात हजारो प्राण्यांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे.

