अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील ‘मन्नत’ बंगल्यासमोर एका चाहत्याने स्वत:वर ब्लेडने वार करून घेतले. शनिवारी रात्री ही घटना घडली. त्या व्यक्तीचं नाव सलीम अहमद असून तो कोलकात्याचा राहणारा असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री शाहरुखच्या घरी दिवाळीनिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ही घटना घडली.
दिवाळी पार्टीसाठी शाहरुखच्या घरी बरेच बॉलिवूड सेलिब्रिटी पोहोचले होते. त्याच्या घराबाहेर चाहत्यांचाही गराडा होता. शाहरुखची भेट न झाल्याने सलीमने स्वत:वर ब्लेडने वार करून घेतल्याचं कळतंय. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आलं. शाहरुखच्या वाढदिवशी त्याला भेटण्यासाठी सलीम कोलकात्याहून मुंबईला आला होता. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही शाहरुख न भेटल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचं समजतंय.
