ऐन दिवाळीत रेनकोटची शोधशोध; पुण्यात पावसाच्या जोरदार सरी

दुपारी 12 च्या सुमारास पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना ऐन दिवाळीत रेनकोट शोधायची वेळ आली. अचानक सुरु झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
दिवाळीच्या पहिल्याच रात्री पुण्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावल्यानंतर आज दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सकाळी ऊन पडलेले असताना दुपारी 12 च्या सुमारास अचानक ढग भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. पुण्यातील मध्यवर्ती भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली तर उपनगरात चांगलाच पाऊस झाला. सहकारनगर, स्वारगेट या भागामध्ये काहीवेळ जोराचा पाऊस झाला.

अचानक सुरु झालेल्या पावसामुळे अनेकांनी दुकानांच्या आसरा घेतला. तर काहींना भिजतच आपले कार्यालय गाठावे लागले. रस्ते निसरडे झाल्याने काही ठिकाणी दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडल्या. ऐन दिवाळीत पुणेकरांना पावसाळी वातावरण अनुभवायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *