पेस्ट कंट्रोलमुळे मुलाचा मृत्यू

सिंहगड रोडवरील आनंदनगरमधील एका फ्लॅटमध्ये औषध फवारणी (पेस्ट कंट्रोल) केल्यानंतर घरात झोपल्यामुळे एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला; तर कुटुंबातील तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी अकरा वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, हॉटेलमध्ये जेवण केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, घरात पेस्ट कंट्रोल  केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.

सार्थक पंडित डोंगरे (वय नऊ वर्षे, रा. आनंदनगर, सिंहगड रोड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, त्याचा भाऊ साहिल (वय ११) याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. वडील संदीप (वय ३१) व त्यांची पत्नी जाह्नवी (वय २९) यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हे त्यांची पत्नी व दोन मुले आनंदनगर येथील सिद्धार्थ अर्पाटमेंट येथे राहतात. त्यांचा तीन खोल्यांचा प्लॅट आहे. संदीप हे तुळजाभवानी इंटरप्रायझेस या ठिकाणी पेस्ट कंट्रोलचे काम करतात. रविवारी गणेश विसर्जन होते. संदीप यांनी घरात ढेकूण झाल्याने पेस्ट कंट्रोल केले होते; त्यानंतर घर बंद करून सर्व जण विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले. त्यानंतर ते रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास परत आले. त्यानंतर सगळे घरात झोपले. मात्र, पहाटेपासून चौघांनाही उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी संदीप यांनी रुग्णालयात न जाता बाहेरून गोळ्या घेतल्या. मात्र, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक सार्थकला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. जाह्नवी यांनाही त्रास होत होता. त्यामुळे त्या सार्थकला घेऊन खासगी रुग्णालयात गेल्या. त्या वेळी डॉक्टरांनी सार्थकला पाहून त्याला ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. साथर्कच्या चुलत्यांनी त्याला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. जाह्नवी यांचीही प्रकृती खालावत असल्याने उपाचारासाठी डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेतले. सार्थकला ससून रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता तो मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोड पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन माहिती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सार्थकचा मोठा भाऊ साहिल व वडील संदीप यांनाही उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे नातेवाइकांना त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. साहिल याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारानंतर संदीप हे मंगळवारी शु‌द्धीवर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांनी घरात पेस्ट कंट्रोल केल्याचे सांगितले. पेस्ट कंट्रोल करून गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी बाहेर पडलो. घरी येताना खाण्यासाठी भेळ घेऊन आलो होतो. ती खाल्ल्यानंतर झोपल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी घराची पाहणी केली. त्या वेळी भेळ आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी भेळ तपासणीसाठी पाठविली आहे. त्यामुळे शवविच्छेदनाचा व भेळीचा अहवाल आल्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, अन्नातून विषबाधा झाली नसल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस तपास करत आहेत.

या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. इतरांची प्रकृती स्थिर असल्याचे सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.

पूर्वी घडलेल्या घटना

नोव्हेंबर २०१५- निगडी येथील यमुनानगरमध्ये प्रेमांकूर सोसायटीमध्ये पेस्ट कंट्रोलमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.

ऑगस्ट २०१५- कोथरूड परिसरातील सरस्वती पार्कमध्ये पेस्ट कंट्रोलच्या वासाने गुदमरून दोन जुळ्या बहिणींचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *