शस्त्रक्रियांदरम्यान लागणारे साहित्य पुरवणाऱ्या कंपन्यांचे ९० कोटी रुपये राज्य सरकारने थकवल्याने कंत्राटदारांनी सरकारी रुग्णालयांना साहित्य न पुरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शस्त्रक्रिया रखडण्याची भीती निर्माण झाली असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात रुग्णांना लॉण्ड्रीतून कपडे धुवून न मिळाल्याने सोमवारी तब्बल ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागण्याची नामुष्की रुग्णालय प्रशासनावर ओढवली. विशेष म्हणजे इतकी मोठी घटना घडल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून सार्वजनिक सुट्ट्यांच्या नावाने लपवाछपवी केली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
सायन रुग्णालयातील रुग्णांचे ५० टक्के कपडे प्रभादेवी येथील पालिकेच्या सेंट्रल लॉण्ड्रीमध्ये व ५० टक्के कपडे खासगी लॉण्ड्रीत धुण्यासाठी पाठवले जातात. खासगी लॉण्ड्रीचे कंत्राट जून २०१७मध्ये संपले असून त्यानंतर आजपर्यंत नवीन निविदा मागवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे खासगी लॉण्ड्रीला जाणारे कपडे सेंट्रल लॉण्ड्रीत धुण्यासाठी पाठवले जात आहेत. सेंट्रल लॉण्ड्रीत फक्त ३८ कर्मचारी असून त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असल्याने मोठ्या प्रमाणात कपडे धुणे शक्य झालेले नाही. रुग्णालयात दररोज सुमारे साडेतीन हजारांहून अधिक कपडे धुण्यासाठी लॉण्ड्रीमध्ये पाठवले जातात.
शस्त्रक्रियेदरम्यान संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णांना स्वच्छ कपडे आवश्यक असतात. ते न मिळाल्याने युरोलॉजी, ऑर्थोपेडिक, न्युरॉलॉजी आणि जनरल शस्त्रक्रिया विभागातील ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत. सोमवारी होणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी आम्हाला तीन महिन्यांपूर्वी तारखा मिळाल्या होत्या, आता पुन्हा नवीन तारखा कधी मिळतील याची माहिती प्रशासन देत नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.
