3 लाखांच्या खंडणीसाठी 11 वर्षांच्या मुलाचं अपहरण करणाऱ्या दोघांना ठाणे जिल्ह्यातल्या वालिव पोलिसांनी अटक केली आहे.
25 जुलै रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारात वसईतल्या आदर्श चव्हाणचं त्याच्या राहत्या घरातून दोघांनी अपहरण केलं. आपला मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबियांना सकाळी कळली. त्याचवेळी अपहरणकर्त्यांनी 3 लाखांची मागणी करण्यासाठी फोन केला. पैसे मिळाले नाहीत, तर आदर्शला मारून टाकण्याची धमकीही दिली. चव्हाण कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधून अपहरणाची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा फोन ट्रॅक केला. आणि त्यांना पैसे घेण्यासाठी बोलवून सापळा रचला. विरारमधल्या एका भागात पैसे घेण्यासाठी आले असताना या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आणि आदर्शची सुखरुप सुटका केली.
या प्रकरणी आदर्श राहत असलेल्या इमारतीतच राहणाऱ्या शिवकुमार मौर्य आणि अमित जैस्वालला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही 18 ते 23 वयोगटातले आहेत.
